गुरांचं शेणसुद्धा विकून खाणारी आघाडी शेतकऱ्यांना न्याय कसा देईल? उद्धव ठाकरेंचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-hatkangale

सामना ऑनलाईन । अमरावती

आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांनी गुरांचं शेणसुद्धा विकून खाल्लं होतं. शेण घोटाळा करणारे हे शेतकऱ्यांनी कसा न्याय देतील? असा खणखणीत सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान केले. अमरावती येथे बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ढोंग उघडे पाडले.

अमरावती येथे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. ‘परभणी येथे प्रचाराला जाताना एका वृत्तपत्रात शरद पवार यांचा चारा छावणीला भेट देतानाचा फोटो पाहिला. यांना चार वर्षांनंतर शेतकरी, दुष्काळ आठवला? गेल्या चार वर्षात जणू महाराष्ट्रात शेतकरी नव्हताच आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी महाराष्ट्रात आला आहे. गेले दोन-पाच वर्ष महाराष्ट्रात सगळं आबादी आबाद होतं, महाराष्ट्रात दुष्काळ नव्हताच. आता निवडणुकीच्या तोंडावर जणू दुष्काळ आला आहे, असेच हे दाखवता आहे, अशा खरपूस शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दु:ख कमी झाले नाही, कारण विचारले तर म्हणाले की शेतकऱ्यांना आघाडी सरकारच्या काळातील शेण घोटाळा आठवला. हे लोक शेतकऱ्यांना कसा न्याय देणार, असे ते म्हणाले. दुष्काळ असताना मी स्वत: शिवसेनेच्या 63 आमदार आमदार घेऊन मराठावाड्यात गेलो होतो. शेतकऱ्यांना मदत केली. त्यांच्या समस्या दूर केल्या, हे शिवसेनेने केले, तेव्हा विरोधी पक्ष कुठे दिसले नाहीत याची आठवण त्यांनी करून दिली.

तसेच या सभेत बोलताना शिवसेना-भाजप युती ही सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वाच्या विचारासाठी झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मागण्या शिवसेनेच्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. राममंदिरासारखा मुद्दा आम्ही उचलला आणि त्यामुळे हालचाल सुरू झाली, म्हणूनच आम्ही पुन्हा युती केल्याचेही त्यांनी सांगितले.