भाजपला देशात चायनासारखी लोकशाही आणायची आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपला आपल्या देशात चायनासारखी लोकशाही आणायची आहे, अंधःकार पसरवायचा आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. संपूर्ण देशात भाजपविरुद्ध लाट आहे. चारशेपारचा नारा ते देत असले तरी दोनशेपारही जाणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर जिथे जिथे जातात, तिथे विरोधकांचा, अन्यायाविरुद्ध बोलणाऱयांचा आवाज दाबला जातो, शेतकऱयांवर कारवाई केली जाते. दहा वर्षे खरोखर देशहिताची, विकासाची कामे केली असतील तर ही दडपशाही करण्याची वेळ का येते, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

नाशिकच्या सिडको येथे महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱयांवर अत्याचार हाच भाजपचा प्रमुख चेहरा झाला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी, महिला, युवा, गरीब या चार जातींचा शोध लावला आहे. या चारही वर्गांवर मोदी सरकारकडून अन्यायच केला गेला. या देशात फक्त एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली जाते, असा टोला त्यांनी मोदी यांना हाणला.

शेतकऱयांवर अन्याय केला जातो, महिलांवर अत्याचार करणाऱयांना पाठीशी घातले जाते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेऊन बेरोजगारी वाढविण्यात आली. महागाईमुळे गरीब जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रद्वेष्टे, गद्दार, हुकूमशाही, संविधान धोक्यात आणणाऱयांच्या विरुद्ध ही लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आमदारकी, खासदारकीच्या पोटनिवडणुका यांनी घेतल्या नाहीत, हा लोकशाहीचा घात आहे. ब्रिटीश आणि भाजपच्या कारभारात फरक नाही, असे टीकास्त्र्ा आदित्य ठाकरे यांनी सोडले. याप्रसंगी उमेदवार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माकपाचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, दत्ता गायकवाड, प्रा. नीलेश कराळे आदींची भाषणे झाली. सभेला संपर्कप्रमुख जयंत दिंडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, डी. जी. सूर्यवंशी, विनायक पांडे, यतिन वाघ, संजय चव्हाण, निवृत्ती जाधव, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, केशव पोरजे, भास्कर गावीत, तानाजी फडोळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.

भूलथापा देऊन भाजपला पुन्हा सरकार आणून चायनासारखी लोकशाही आणायची आहे, अंधःकार निर्माण करायचा आहे. पण, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही ताकदवान असला तरी हा महाराष्ट्र तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. मशाल प्रत्येकाच्या हृदयात पेटली आहे. भाजप, मिंधे गट फक्त मशालीलाच घाबरतो. देशातील अंधःकार दूर करण्यासाठी मशालीला मतदान करा.