साडेसतरा रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही! बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका 

राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासींना वाटलेल्या साडय़ांवरून प्रहारच्या बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. साडेसतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. स्वतः दोन कोटींच्या गाडीत फिरायचे आणि साडेसतरा रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही साडेसतरा रुपयांची साडी मतदारांचे मतपरिवर्तन करू शकत नाही, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमदार बच्चू कडू यांनी भाजपने खासदार नवनीत राणा यांना अमरावतीमधून उमेदवारी दिल्यामुळे राणा यांचा प्रचार करणार नाही आणि त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करू, असे कडू यांनी भाजपला बजावले होते. त्याप्रमाणे कडू यांनी प्रहारकडून दिनेश बुब यांना नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले आहे.