भाजपचा प्रचार सुरू; मिंधे गटाच्या पोटात गोळा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपकडे की मिंधेगटाकडे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे मिंधेगटाच्या पोटात गोळा येऊन कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार म्हणून नारायण राणेंचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे शिंदेगटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही जोरदार तयारी केली आहे. किरण सामंत यांच्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. तेव्हापासून कार्यकर्ते तयारीला लागले होते. मात्र उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले आहेत.

गावभेटी आणि बैठका सुरू

हा लोकसभा मतदार संघ भाजप लढणार की मिंधेगट लढणार हे ही अद्याप निश्चित झालेले नाही. अशावेळी उमेदवारी निश्चित नसताना भाजपने मात्र प्रचाराची तयारी सुरु केली आहे. भाजपचे माजी आमदार बाळ माने हे गावागावात भेटी देत आहेत. कमळ चिन्हाचाच उमेदवार असणार अशाप्रकारे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ यावर येत असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या ते विधानसभा मतदार संघनिहाय बैठका घेणार आहेत.