Lok Sabha Election 2024 : मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका! नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणांनी थेट भाजपच्या अब की बार 400 पारच्या पोकळ नाऱयातील हवा काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. कामाला लागा. मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका. एवढी मोठी यंत्रणा असूनही 2019 मध्ये मी अपक्ष निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडला होता, असे सांगत नवनीत राणा यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला.

अमरावती लोकसभेची उमेदवारी नवनीत राणा यांना दिल्याने प्रहारच्या बच्चू कडू यांनी त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करत राणा यांना आव्हान दिले आहे. त्यात राणा या भाजप प्रदेशाध्यक्षांना लगावलेल्या टोल्यामुळे आधीच वादात सापडल्या होत्या. तो वाद कमी होत नाही तोच आता थेट भाजपच्या 400 पारच्या पोकळ दाव्याची पोलखोल करताना भाजप आणि मोदींना वास्तव परिस्थिती काय आहे हेही दाखवून दिले आहे.

400 पारच्या दाव्यातील हवा काढली – अतुल लोंढे

भाजपचा ‘अब की बार 400 पार’चा नारा हा केवळ निवडणुकीत हवा निर्माण करण्यासाठी दिला जात आहे. मात्र याची खरी कल्पना पक्षाच्या उमेदवारांनाही आहे. म्हणूनच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू नका’ अस सांगत भाजपच्या 400 पारच्या फुग्यातील हवा काढून घरचा आहेर दिला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.