छत्रपती संभाजीनगर: 20 हून अधिक ठिकाणी EVM मशीन बंद, मतदारांची नाराजी

Lok Sabha Election 2024 साठी आज देशभरात विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. आज राज्यातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत असून मतदानासाठी मतदार केंद्रांवर पोहोचत आहेत. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्यानं गोंधळ उडाला असून जवळपास 20 ठिकाणांहून अधिक मतदान केंद्रांवर EVM मशीन बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदार राजाला मात्र EVM मशीन बंद असल्यानं अडचणींचा सामना करावा लागला. मतदारांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अखेर या ठिकाणांवर नवी EVM मशीन सुरू करण्यात आली त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.

बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही EVM मशीन बिघडल्याची घटना समोर आली असून सकाळी पहिल्याप्रथम मतदानासाठी आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास वाट पाहात उभं राहावं लागलं. यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी सकाळच्या वेळात EVM बंद असल्यानं मतदानाची प्रक्रिया काहीशी मंदावली होती.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जागोजागी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या मतदारसंघात सोमवारी एकूण 2040 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. तर बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आहेत. मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलिसांच्या तुकड्याही अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आल्या आहेत.

पुणे, शिरुर, मावळ, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नंदुरबार, रावेर, नगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये आज बंद होणार आहे.