Lok Sabha Election 2024 : भाजप एमआयएमचे साटेलोटे, एक मुस्लिमांना भडकतात दुसरे हिंदूना; दिग्विजय सिंह यांची टीका

digvijay-singh

भाजप व एमआयएमचे साटेलोटे आहे. हे दोन्ही पक्ष लोकांना भडकवण्याचे काम करतात. एक मुस्लिमांना भडकवतो तर दुसरा हिंदूना; अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप व एमआयएम वर टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एमआयएमला पैसा कुठून मिळतो? असा सवाल देखील केला.

दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशमधील राजगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शनिवारी सुसनेर येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी भाजप व एमआयएमवर टीका केली. ”मुस्लिमांची मतं फोडण्यासाठी औवेसीला निवडणूकीला उतरवले जाते. मात्र त्यासाठी पैसा कुठून येतो. भाजप व एमआयएम हे कायम एक दुसऱ्याला फायद्याचे राजकारण करतात. देशात लोकशाहीची हत्या होत आहे. लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. भाजप एक कलंकित नेत्यांना साफ करण्याची वॉशिंग मशीन आहे, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली.

दिग्विजय सिंह हे 16 एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यंदा त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन न करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन करू नये असे आवाहन केले आहे. ”मी उमेदवारी अर्ज भरायला जाताना अत्यंत शांत वातावरणात जाणार आहे. मला शक्ती प्रदर्शन करायचे नाही. शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी मतदारांमध्ये जाऊन जनजागृती करावी, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.