फोडाफोडी अन् जमवाजमव; गुजरातमधील ‘झोल’ची ECI कडून पोलखोल; निवडणुकी दरम्यान सर्वाधिक दारू, पैसा, ड्रग्ज जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांसह देशभरात 49 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांसह मतदारांनाही याची उत्सुकता असतानाच निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गेल्या दोन महिन्यात विविध यंत्रणांनी देशभरातून रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान वस्तू जप्त केल्या याची आकडेवारी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळात जवळपास 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त केलेल्या मुद्देमालात अडीच पट वाढ झाली आहे. विशेष या सर्वाधिक वाटा गुजरातचा आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 8 हजार 889 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी 45 टक्के वाटा अंमली पदार्थांचा असून 23 टक्के वाटा फ्रिबीज, तर 14 टक्के मौल्यवान वस्तू आहेत. विविध तपास यंत्रणांनी देशभरातून 849 कोटी रुपयांची रोकड आणि 815 कोटी रुपयांची 5.4 कोटी लिटर दारू जप्त केली आहे. या यादीमध्ये गुजरात पहिल्या, तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये रोख रक्कम, ड्रग्ज, दारू असा एकूण 1461.73 कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे.

निवडणूक काळात सर्वाधिक मुद्देमाल सापडलेले पाच राज्य/केंद्रशासित प्रदेश

1. गुजरात – गुजरातमध्ये 8.61 कोटींची रोकड, 1187.80 कोटींचे ड्रग्ज, 29.76 कोटींची दारू आणि 107 कोटींचे फ्रिबीज असा एकूण 1461.73 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

2. राजस्थान – राजस्थानमध्ये 42.30 कोटींची रोकड, 216.42 कोटींचे ड्रग्ज, 48.29 कोटींची दारू आणि 776.77 कोटींचे फ्रिबीज असा एकूण 1133.82 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

3. पंजाब – पंजाबमध्ये 15.45 कोटींची रोकड, 665.67 कोटींचे ड्रग्ज, 22.62 कोटींची दारू आणि 7.04 कोटींचे फ्रिबीज असा एकूण 734.54 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

4. महाराष्ट्र – महाराष्ट्रात 75.49 कोटींची रोकड, 265.51 कोटींचे ड्रग्ज, 49.17 कोटींची दारू आणि 107.46 कोटींचे फ्रिबीज असा एकूण 685.81 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यता आला.

5. दिल्ली – दिल्लीमध्ये 90.79 कोटींची रोकड, 358.42 कोटींचे ड्रग्ज, 2.64 कोटींची दारू आणि 6.46 कोटींचे फ्रिबीज असा एकूण 653.31 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.