Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात भाजपला उखडलं; किती जागांचं होणार नुकसान?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. गेल्या (2019) निवडणुकीपेक्षा यंदा पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरला आहे. मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीची सत्ताधाऱ्यांनी धडकी घेतली आहे. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडच्या भाषणांवरून पहिल्या टप्प्यातील निवडणूक एनडीएसाठी जड गेल्याचे दिसतेय. यामुळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित अनेक लोकं नाराज झाले आहेत, असे कपिल सिब्बल म्हणाले. एवढेच नाही तर महाराष्ट्र काँग्रेसनेही या संदर्भात ट्विट केले असून पहिल्या टप्प्यात भाजपला किती जागांचे नुकसान होत आहे याची आकडेवारीच मांडली आहे.

काय आहे पोस्ट?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या 102 जागांसाठी मतदान झाले, त्यापैकी सध्या 51 जागा NDA आघाडीकडे आहेत. याचा अर्थ स्थिती कायम ठेवण्यासाठी भाजपला 50 टक्के जागा जिंकणे आवश्यक आहे, तर मतदानाची घटती टक्केवारी भाजपच्या विरोधात जात आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानात केवळ 62 टक्के लोकांनी मतदान केले, तर 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 66 होती. भाजपचा प्रचंड प्रचार आणि प्रसारमाध्यमांचा पाठिंबा असूनही कमी मतदान हा भाजपसाठी चिंतेचा विषय बनला आहे. हेच आकडेवारीतून समजून घेवू…

  • पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी भाजपला फक्त 16 जागांवर निश्चित विजय मिळत आहे, तर 129 जागांवर निकराची लढत होत आहे.
    2019 मध्ये NDA आघाडीच्या 51 जागा कमी होऊन 35 होणार आहेत. यानुसार भाजपला पहिल्या टप्प्यातच जवळपास 16 जागांचे थेट नुकसान सोसावे लागत आहे.
    काँग्रेस आघाडीबाबत बोलायचे झाले तर पहिल्या टप्प्यातील मतदानात प्रचंड उत्साह आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 13 जागांचा थेट फायदा भारत आघाडीला होत आहे. 16 जागांपैकी भाजपच्या वाट्याच्या 3 जागा इतर/प्रादेशिक पक्षांना जाण्याची शक्यता आहे.

कमी मतदानाचा अर्थ

  • कमी मतदानाचा फायदा नेहमीच काँग्रेसला होतो, तर वाढत्या मतदानाचा फायदा भाजपच्या बाजूने जातो.
  • 2004 आणि 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी आश्चर्यकारकपणे कमी होती, दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसची आघाडी सरकारे स्थापन झाली.
  • 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ नोंदवली गेली, परिणामी, दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप युतीचे सरकार स्थापन झाले.
  • आता पुन्हा एकदा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, हे भाजप सरकारच्या बाहेर जाण्याचे स्पष्ट संकेत आहे.
  • 2014 मध्ये यूपीमध्ये एकूण मतदानात 5 टक्के घट झाली होती. यावेळी राज्यात केवळ 48 टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजपचे थेट नुकसान झाले आणि भाजपच्या जागा 11 झाल्या.
  • 2009 मध्येही उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी घसरली. यावेळी 0.38 टक्के कमी मतदान झाले. मतदानाच्या घसरणीचा फायदा काँग्रेसला झाला आणि 21 जागा जिंकल्या.
  • 2014 आणि 2019 मध्ये यूपीमध्ये मतांची टक्केवारी वाढली. 2014 मध्ये देशातील सर्वात मोठ्या राज्यात 2009 च्या तुलनेत 10 टक्के जास्त मतदान झाले आणि भाजपच्या जागा 73 वर गेल्या.
  • तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झाले. गेल्या वेळेच्या तुलनेत येथे 3 टक्के कमी मतदान झाले. यावेळी येथे 69.49 टक्के मतदान झाले.
  • २2019 मध्ये तामिळनाडूमध्येही मतांची टक्केवारी घटली होती, ज्याचा थेट फायदा काँग्रेस आणि DMK आघाडीला झाला. युतीने येथे 38 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या.
  • राजस्थानमध्ये 2009 मध्ये एक टक्का मत घसरले असतानाही काँग्रेसला 16 जागा मिळाल्या होत्या.

पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्यानंतर आता भाजपचा पराभव होणार हे निश्चित आहे. भाजपचा कार्यकर्ता निराश होऊन घरी बसला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने हे सिद्ध केले की, देशातील सामान्य माणूस भाजपला निरोप देऊन महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकरी कर्जमाफी/एमएसपी, कामगारांना सन्माननीय वेतन आणि त्यांच्या हक्काचा वाटा यासाठी लढण्याची शपथ घेऊन बाहेर पडला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मतदान करा. ही लोकशाहीची हाक आहे. ही काळाची हाक आहे. ही भारताची हाक आहे, असे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून केले आहे.