Lok Sabha Election 2024: आज मतदार आणि उमेदवारांना घाम फुटणार

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी 13 मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदारसंघामध्ये तापमान वाढीसोबत हवेतील आर्द्रताही वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने मतदार आणि उमेदवारांनाही दरदरून घाम फुटण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या वतीने निवडणूक आयोगाला मतदानाच्या दिवशीच हवामानाचा अंदाज दिला जातो.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांत वेधशाळेने उष्णतेच्या लाटेचा दिलेला इशारा अचूक ठरला होता.

मुंबईतील कुलाबा हवामान विभागाने आता पाचव्या टप्प्यात राज्यात होणाऱया 13 लोकसभा मतदारसंघांतील हवामानाचाही अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार या 20 मे रोजी तापमान वाढणार असल्याने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

उत्तर-पूर्व मतदारसंघ तापणार

उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पैसेवाटपावरून वातावरण तापले आहे. आता मुंबईतील याच उत्तर पूर्व मतदारसंघात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. धुळे मतदारसंघ 44 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापलेला राहील.

आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा

13 मतदारसंघांतील धुळे , दिंडोरी व नाशिक या तीन लोकसभा मतदारसंघांत आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील, मात्र संध्याकाळी आकाश ढगाळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पालघरपासून दक्षिण मुंबईपर्यंतच्या मतदारसंघात आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील, पण उष्णतेचे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यावर अंगातून घामाच्या धारा वाहण्याची चिन्हे असतात. त्यामुळे मतदार आणि उमेदवार घामाघूम होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघ आणि कमाल तापमान

धुळे 42 ते 44 अंश सेल्सिअस
दिंडोरी 40 ते 42 अंश सेल्सिअस
नाशिक 39 ते 41 अंश सेल्सिअस
पालघर 35 ते 37 अंश सेल्सिअस
भिवंडी 39 ते 41 अंश सेल्सिअस
कल्याण 39 ते 41 अंश सेल्सिअस
ठाणे 38 ते 40 अंश से.
उत्तर मुंबई 35 ते 37 अंश सेल्सिअस
उत्तर पश्चिम मुंबई 34 ते 36 अंश से.
उत्तर-पूर्व मुंबई 36 ते 38 अंश सेल्सिअस
उत्तर-मध्य मुंबई 34 ते 36 अंश सेल्सिअस
दक्षिण-मध्य मुंबई 35 ते 37 अंश सेल्सिअस
दक्षिण मुंबई 33 ते 35 अंश सेल्सिअस