शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या लढती, कोणाची होणार सरशी?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. त्यात मतदार कोणाला कौल देणार याबद्दल सर्व्हे केले जात आहेत. भाकिते वर्तवली जात आहेत. प्रचाराला मिळालेला प्रतिसाद, मतदारांच्या प्रतिक्रिया, मतदारसंघांमधील वातावरण यावरून कोणाची सरशी होणार याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

मुंबई, ठाणे, भिवंडी, धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघरमध्ये 13 जागांसाठी उद्या मतदान होत आहे. गेल्या चार टप्प्यांत महाराष्ट्रातील 35 जागांवर मतदान पार पडले आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि मिंधे गटाने अनेक खासदार आणि पेंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचे भवितव्य उद्या ईव्हीएमबंद होणार आहे. महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचीही चिंता वाढल्याचे दिसत आहे.

उत्तर-पश्चिम मुंबईत पळपुटय़ांचे भवितव्य अनिश्चित

ईडी चौकशीला धाडसाने सामोरे जाणारे शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि कारवाईच्या भीतीने भाजपात पळालेले रवींद्र वायकर यांच्यात उत्तर पश्चिम मुंबईत लढत होत आहे. तेथील एपंदरीत वातावरण पाहिले तर लढत जरी चुरशीची झाली तरी पळपुटय़ांचे राजकीय भवितव्य अनिश्चित आहे, असे मतदार सांगतात.

कल्याणमध्ये शिंदे पिता-पुत्र टेन्शनमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून तिसऱयांदा रिंगणात आहेत. शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करून त्यांना घाम पह्डला आहे. त्यामुळे मिंधे गटासाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

पालघरमध्ये भारती कामडींचे भाजप, बविआला आव्हान

पालघर मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत शिवसेनेच्या भारती कामडी, भाजपचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यामध्ये आहे. कामडी या आदिवासी कार्यकर्त्या असून सावरा, पाटील यांना त्यांनी आव्हान दिले आहे.

धुळ्यात माजी मंत्री भामरे चिंतेत

धुळे मतदारसंघात माजी मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे विरुध्द महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यातील लढत चुरशीची होणार आहे. गेल्या निवडणुकीत बागलाणने भाजपाला 74 हजारांचे मताधिक्य दिले होते. आता येथे कांदा निर्यातबंदीचा विषय पेटला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांच्यामुळे ही लढत तिरंगी झाली आहे.

दिंडोरीत पेंद्रीय मंत्री भारती पवारांचे भवितव्य टांगणीला

दिंडोरीत पेंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांच्यातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात दिंडोरीत चुरशीची लढत झाली आहे. भाजपात जाण्यापूर्वी भारती पवार या येथून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. आता त्या भाजपमध्ये असल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

नाशिकची लढत रंगतदार

नाशिक मतदारसंघात खरी लढत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आणि मिंधे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात आहे. पण भाजपावर नाराज होऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या शांतीगिरी महाराजांमुळे ही लढत आणखी रंगतदार होणार आहे.

भिवंडीत कपिल पाटलांना बाळ्यामामांनी दिली टफ

भिवंडी मतदारसंघात सलग तिसऱयांदा खासदारकीला उभे असलेले भाजपचे कपिल पाटील यांना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामांनी चांगली टफ दिली आहे. भिवंडीत काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्याचा फायदा आघाडीच्या बाळ्यामामांना होईल असे चित्र आहे.