खासदार विनायक राऊत यांचा 17 व्या लोकसभेचा 100 टक्के निधी खर्च

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी 17 व्या लोकसभेचा खासदार निधी 100 टक्के खर्च केला आहे. खासदार विनायक राऊत यांचा खासदार निधी अखर्चित राहिला अशी ओरड करणाऱ्या विरोधकांना त्यामुळे चपराक बसली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी 57 टक्के निधी वाया घालवला अशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात खासदार विनायक राऊत यांनी 17 व्या लोकसभेचा 100 टक्के निधी खर्च केला आहे. तशी आकडेवारी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. 2019-20 मध्ये 5 कोटी, 2021-22 मध्ये 2 कोटी, 2022-23 मध्ये 5 कोटी, 2023-24 मध्ये 5 कोटी रूपये असा एकूण 17 कोटी रूपये निधी आला होता. 16 व्या लोकसभेचा शिल्लक 3 कोटी 29 लाख 45 हजार रूपये निधी आणि व्याजाचे 33 लाख 80 हजार असा एकूण 20 कोटी 29 लाख 25 हजार रूपये निधी उपल्बध झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 9 कोटी 17 लाख 83 हजार रूपये निधीची कामे मंजूर झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 कोटी 11 लाख 42 हजार रुपयांची कामे मंजूर झाली. अशा प्रकारे 20 कोटी 29 लाख 25 हजार रुपयांचा निधी खर्च झाला. केंद्र शासनाच्या बचत खात्यात 9 कोटी 50 लाखाचा निधी प्राप्त झाला. 16 व्या लोकसभेचा शिल्लक 3 कोटी 29 लाख 45 हजार रूपये निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून प्राप्त झाला. 33 लाख 80 हजार रूपये व्याजाची रक्कम प्राप्त झाली. एकूण 13 कोटी 13 लाख 25 हजार रूपये निधी प्राप्त झाला. त्यापैकी 12 कोटी 47 लाख 99 हजार रूपये निधी वितरीत करण्यात आला. ई-साक्षी पोर्टलद्वारे 7 कोटी 35 लाखाचा निधी प्राप्त झाला. ई-साक्षी पोर्टलवर मंजूर केलेल्या कामांची रक्कम 7 कोटी 34 लाख 92 हजार रूपये आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांचा 100 टक्के विकासनिधी खर्च झाला आहे .प्राप्त झालेल्या निधीपैकी 95 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे.