Lok Sabha Election 2024: नवाब मलिक यांच्या नाराजीचा महायुतीला अणुशक्तीनगरमध्ये फटका

Lok Sabha Election 2024: अणुशक्ती नगर विधानसभेचे आमदार नवाब मलिक आणि आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यातील वितुष्ट अद्याप कायम आहे. कारण राहुल शेवाळे यांनी नवाब मलिक यांचा देशद्रोही असा उल्लेख केला होता. त्याचा राग अद्याप नवाब मलिक यांच्या मनात खदखदत आहेत. त्यामुळे नवाब मलिक हे महायुतीच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. त्याचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील अणुशक्तीनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नबाव मलिक हे ईडीच्या कारवाईनंतर जेलमध्ये होते. जेलमधून सूटून बाहेर आल्यावर त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात हजेरी लावली आणि सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिल्याचे विधानसभेत दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरील त्यांच्या उपस्थितीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टिका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला. आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आणि अशा प्रकारे नवाब मलिक यांच्यावर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेणे योग्य ठरणार नाही असे पत्रात म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. पण ते अजूनही अजित पवार गटात पर्यायाने महायुतीत असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

महायुतीत असूनही ते दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु असल्याने ते सध्या घरीच आहेत. प्रचारात सहभागी न होण्यामागे वैद्यकीय कारण असले तरी नवाब मलिक हे महायुतीच्या नेत्यांवर आणि खास करून राहुल शेवाळे यांच्यावर कमालिचे नाराज आहेत. कारण राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचा उल्लेख देशद्रोही म्हणून असा केला होता. तो राग अजूनही नवाब मलिक यांच्या मनात कायम आहे.