सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला; लोकसभेच्या 58 जागांवर आज मतदान

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी थंडावला. सहा राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांतील 58 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. दिल्लीतील 7, हरयाणातील 10 आणि उत्तर प्रदेशातील 14 जागांचा यात समावेश आहे. तसेच जम्मू- कश्मीरमधील अनंतनाग- राजौरी मतदारसंघातही मतदान होणार आहे.

सहाव्या टप्प्यात एकूण 889 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणरा आहे. नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली आणि चांदनी चौक तसेच उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड तर जम्मू आणि कश्मीरचे अनंतनाग-राजौरी, पश्चिम बंगालचे तुमलूक, मेदिनीपूर, हरयाणाचे कर्नाल, कुरुक्षेत्र, गुडगाव, रोहतक आणि ओदिशाचे भुवनेश्वर, पुरी आणि संबलपूर या महत्वाच्या जागांवर उद्या मतदान होणार आहे.

ओदिशात विधानसभेसाठी मतदान

ओदिशात शनिवारी लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात 42 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

हे उमेदवार रिंगणात

सहाव्या टप्प्यात 3 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे निवडणूक रिंगणात आहेत. मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे तीन माजी मुख्यमंत्रीही निवडणूक लढवत आहेत. याशिवाय मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर आणि निरहुआ हेदेखील रिंगणात आहेत.