ऊन असो की, पाऊस वादळ कधी थांबत नसते; वर्ध्यामध्ये गाडी सोडून शरद पवार भर उन्हात बसले प्रचाररथात

वर्धामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 80 वर्षांतला सळसळता उत्साह सर्वांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे. काळे यांच्यासाठीच्या प्रचाराचे भाषण झाल्यावर पवार आपल्या गाडीत बसण्याऐवजी अमर काळे यांच्या भर उन्हातून जाणाऱया प्रचाररथात बसले. शरद पवार यांचा हा उत्साह आणि उमेदवारासाठी काय पण करण्याची वृत्ती यामुळे पवार नावाच्या वादळाची चर्चा साताऱयातल्या पावसातल्या भाषणानंतर पुन्हा एकदा रंगली आहे.

वर्धा येथे शरद पवार यांचे आज स्वाध्याय मंदिर येथे सभेसाठी आगमन झाले. भाषण आटोपल्यावर ते गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना त्यांच्या गाडीकडे वाट करून द्यायला सुरुवात केली. मात्र, आपल्या गाडीत बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार, असा आग्रह शरद पवार यांनी धरला. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. प्रचाररथावर चढणार कसे, असा प्रश्न आला. कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. मंदिरातील एक शिडी आणून त्या आधारे शरद पवार अखेर रथावर स्वार झाले. उन्ह असो की, पाऊस पवार नावाच्या या वादळाला कोणी थांबवू शकत नाही, ते त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, अनिल देशमुख, प्रा. सुरेश देशमुख, नरेंद्र ठाकरे, राजू तिमांडे, अभिजीत वंजारी, शेखर शेंडे, सुधीर कोठारी, चारुलता टोकस, वीरेंद्र जगताप उपस्थित होते.