पराभवाच्या धास्तीने मिंध्यांनी जरांगेंवरील ‘संघर्ष योद्धा’चित्रपटाचे प्रदर्शन रोखले

लोकसभेतील पराभवाच्या धास्तीने ग्रासलेल्या मिंध्यांनी सेन्सॉर बोर्ड आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आहे. दोन्ही संस्थांवर दबाव आणून सरकारने मुद्दाम हे कारस्थान केल्याचा आरोप चित्रपटाच्या टीमने आज पत्रकार परिषदेत केला. मात्र चित्रपट 21 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असा निर्धार निर्माते गोवर्धन दोलताडे व दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांच्या आयुष्यातील संघर्षावर हा चित्रपट मोठा खर्च करून पूर्ण करण्यात आला. त्याचे सेन्सॉर बोर्डात स्क्रीनिंगही करण्यात आले. त्यानुसार 26 एप्रिल रोजी राज्यातील 3 हजार स्क्रीनवर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तही ठरला होता. मात्र लोकसभेच्या रणधुमाळीत मिंध्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व नेत्यांना मराठा आंदोलकांनी गावबंदीचा दणका देताच पराभवाच्या धास्तीने ग्रासलेल्या मिंध्यांनी निवडणूक आयोग व सेन्सॉर बोर्डाला हाताशी धरून निर्मात्याला संघर्षयोद्धा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचे बजावले. मात्र हे सांगताना सरकारची सालदारी करणाऱया या दोन्ही संस्थांनी कारण देण्याची तसदीही घेतली नसल्याचे चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले.