गद्दारांना घाम फुटला, आता काय करायचे? मिंधेंवर उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव

जागावाटपाच्या मुद्दय़ावरून मिंधे गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक तास गायब होते. ते कुठे गेले हे कुणालाही माहीत नव्हते. अशा परिस्थितीत मिंधे गटातील नेते सुरेश नवले यांनी खळबळजनक विधान केले आहे. शिवसेनेच्या वाटय़ाला येणाऱया लोकसभा मतदारसंघांमधील काही उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा शिंदेंवर प्रचंड दबाव असल्याचे नवले यांनी म्हटले आहे. शिंदेंच्या विश्वासातल्या आणि जवळच्या माणसांनाच त्यांच्यापासून दूर करण्याचे भाजपचे षड्यंत्र सुरू आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

आयबीचा रिपोर्टचा दाखला देत भीती घातली

सुरेश नवले यांनी प्रसारमाध्यमांसमोर हे विधान केले. मिंधे गटातील अनेक लोक भाजपला नको आहेत, त्यांना बदलावे असा भाजपचा आग्रह आहे. आयबीचा रिपोर्ट त्यांच्याविरोधात आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतही त्यांच्याविरोधात मते आहेत अशी कारणे त्यासाठी दिली जात आहेत, असे नवले म्हणाले.

भाजपकडून अपप्रचार

भाजपच्या षड्यंत्राला एकनाथ शिंदे हे बळी पडणार नाहीत. ते ठाम आहेत. त्यांच्यावर आमचा व्श्वास आहे, पण भाजपकडूनच बाहेर त्यांचा अपप्रचार केला जात आहे, असे नवले म्हणाले. शिवसेनेशी गद्दारी करून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांना उमेदवारीची अपेक्षा आहे, पण भाजप दबावतंत्राचा अवलंब करून त्यांचे तिकीट कापत आहे, असा नवले यांचा दावा आहे.

12 खासदारांमध्ये ही स्थिती मग 288 आमदारांमध्ये काय होणार?

12 खासदारांमध्ये ही स्थिती असेल तर विधानसभेच्या 288 जागांच्या वाटपावेळी काय होणार याची कल्पना केली तर अंगावर काटा उभा राहतो, अशी भीतीही नवले यांना वाटू लागली आहे. उद्या भाजपवाले आम्ही सांगू तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने 288 पैकी 277 जागा मागतील आणि फक्त 10 जागा शिंदेंना देतील, अशीही शंका त्यांनी उपस्थित केली आहे.