नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करताना तारतम्य बाळगावे; सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेत्याला सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने आज राजकीय नेत्यांकडून मागचापुढचा विचार न करता करण्यात येणाऱया जाहीर वक्तव्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करताना तारतम्य बाळगावे, विचार करून बोलावे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते एच. राजा यांना सुनावले. तसेच द्रविड आंदोलनातील नेते पेरियार आणि तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी तसेच डीएमकेच्या नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी एच. राजा यांच्याविरोधातील गुन्हेगारी खटले रद्द करण्यास नकार दिला.

2018 मध्ये एच. राजा यांनी  पेरियार, डीएमके नेत्यांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी केली होती. याप्रकरणी एच. राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु  उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे एच. राजा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

नेंत्याने काय केली होती टिप्पणी?

पेरियार नावाचे प्रसिद्ध ईवी रामासामी यांच्याविरोधात एच. राजा यांनी वक्तव्य तसेच ट्विटही केले होते. नास्तिक नेत्यांच्या प्रतिमा, मूर्ती तोडून टाकाव्यात, असे विधान एच. राजा यांनी केले होते. तसेच पेरियार यांना जातीय, कट्टरपंथी असे संबोधले होते.