
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या पराभवामुळे महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद उर्फ मिरची बाबा यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सिंह विजयी व्हावे यासाठी मिरची बाबांनी भोपाळमध्ये 5 क्विंटल मिरच्यांचा यज्ञ केला. एवढेच नाही सिंह हरले तर आपण जलसमाधी घेणार अशी घोषणाही त्यांनी केली होती. पण साध्वी यांनी दिग्विजय यांना पराभूत केल्यापासून बाबा गायब झाले आहेत. यामुळे निरंजन अखाड्याने मिरची बाबांची हकालपट्टी केली आहे.
मिरची बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्यासाठी मिरची यज्ञ केल्याचे काही दिवसांपू्र्वी निरंजन आखाड्याला कळाले. बाबांच्या या यज्ञावर नाराज होत अखाड्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, भोपाळमध्ये मिरची बाबांबरोबरच कॉम्प्युटर बाबांनी देखील दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी 7 हजार साधूसंतांसोबत यज्ञ केला होता. पण भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी 3 लाख मताधिक्क्यांनी दिग्विजय यांचा पराभव केला.

























































