लोकाधिकारचा निर्धार; पुन्हा विधान भवनावर भगवा!l हजारोंच्या उपस्थितीत सुवर्णमहोत्सवी अधिवेशन संपन्न

मराठी माणसाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अखंडपणे लढत राहणार, असे अभिवचन देतानाच विधान भवनावर शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकवण्याचा निर्धार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज केला. महासंघाचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन प्रभादेवी येथील बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन येथे पार पडले. या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती लाभली. लोकाधिकारचे हजारो कार्यकर्ते अधिवेशनासाठी उपस्थित होते.

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1974 साली लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत हजारो मराठी माणसांना महासंघाने सरकारी आस्थापनांमध्ये नोकऱया मिळवून दिल्या. महाराष्ट्रातील सरकारी आस्थापनांमधील 80 टक्के पदे मराठी उमेदवारांना मिळावीत यासाठी महासंघ अविरतपणे प्रयत्नशील असतो. या चळवळीला आज 50 वर्षे पूर्ण झाली. आजच्या सुर्वणमहोत्सवी अधिवेशनाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. मराठी माणसावर होणारा अन्याय मोडून काढू हे ब्रीदवाक्य घेऊन जिद्दीने, जिगरीने काम करणाऱया लोकाधिकार महासंघाच्या धगधगत्या चळवळीचा आढावा यावेळी मान्यवरांनी घेतला.

याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे, चंदूमामा वैद्य, महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्यासह पदाधिकारी नीलिमा भुर्के, वामन भोसले, प्रदीप बोरकर, अनिल चव्हाण, दिनेश बोभाटे, हेमंत गुप्ते, उल्हास बिले, शरद जाधव, सुधाकर नर, विलास चव्हाण, उमेश नाईक, श्रीराम विश्वासराव, शरद एक्के, ललित साने, हेमंत रासम, संदीप गावडे, रमेश गवळी, प्रवीण हाटे, सलिल कोटकर, तुकाराम गवळी, विजय अडसुळे, नंदू कासकर, दिनेश भोसले, अजित सुभेदार, गांधी, विभागप्रमुख महेश सावंत, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे आदी उपस्थित होते.