शेतकऱ्यांशी माझे रक्ताचे नाते! उद्धव ठाकरे यांचे भावनिक उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ईश्वरपूर

मी शेतकरी नेता नाही, पण शेतकऱ्यांच्या डोळय़ातील अश्रू, त्यांचे भाव मला कळतात. मी शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच मी युती केली आहे; कारण शेतकरी आणि माझे रक्ताचे नाते आहे, असे भावनिक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईश्वरपूर येथील विराट जाहीर सभेत काढले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार आसुड ओढले. शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे, शेतकऱ्यांचे रक्त सांडणारे नतद्रष्ट काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, असा थेट सवालच उद्धव ठाकरे यांनी केला.

Photo : पाहा उद्धव ठाकरे यांच्या इस्लामपूर येथील सभेची क्षणचित्रे

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ईश्वरपूर येथे विराट सभा झाली. खुले नाटय़गृहाच्या भव्य पटांगणात झालेल्या या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले याचे समाधान आहे
शाळेत जाण्यासाठी एस.टी. पासला पैसे नाहीत म्हणून एका शेतकऱ्याच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली. ही बातमी मला समजताच आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना फोन केला आणि ताबडतोब काहीतरी करा असे सांगितले. रावते यांनी शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना  9 लाख रुपयांचे एस.टी. चे मोफत पास दिले. शिवसेनाप्रमुखांवर निष्ठा असणाऱ्या दिवाकर रावते यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे माझ्यावर प्रेम आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आई-वडिलांकडे विवाहासाठी पैसे नाहीत म्हणून दोन बहिणींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शिवसेनेने जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न सोडविला याचे समाधान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नाशिकहून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत येत होता. शेतकऱ्यांचे पाय रक्ताळले होते. या हजारो शेतकऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय शिवसेनेने केली. शेतकऱ्यांच्या या रक्ताशी माझे नाते आहे. हे नाते कायम राहणार आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

राहुल गांधींसारखा नालायक लोकसभेत पोहोचता कामा नये
देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात प्रचंड यातना भोगल्या. त्यांचा अवमान करणाऱ्या नालायक राहुल गांधींसारख्यांच्या हातात देश देणार आहात का, असा संतप्त सवाल करीत राहुल गांधींसारखा नालायक लोकसभेत पोहचता कामा नये याची खबरदारी घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

ईश्वरपूर आणि परिसर वीरांची भूमी
ईश्वरपूर आणि परिसर ही वीरांची भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. संसदेत मराठी भाषण करणारे क्रांतिसिंह हे पहिले नेते होते. मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार असे पंडित नेहरूंना त्यांनी ठणकावून सांगितले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा  – सदाभाऊ खोत
राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. त्याला आपल्याला आता हाणायचं आहे, अशी आक्रमक सुरुवात करीत रयत क्रांती संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात खासदार राजू शेट्टी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

मतदारच शेट्टींचा हिशेब चुकता करतील – धैर्यशील माने
आज महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आणि आजच्याच दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबाचा प्रगट दिन आहे. या दिवशीच होणारी ही विजय संकल्प सभा म्हणजे दख्खनच्या राजाला अभिवादन करून विजयाच्या गुलालाची रंगपंचमीच खेळायची असल्याचा विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेना सांगली-सातारचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, ईश्वरपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महिला आघाडी संघटनप्रमुख छाया कोळी, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दि. बा. पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, माजी मंत्री शिवाजी नाईक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सांगली जिल्हाप्रमुख आनंद पवार, संजय विभुते, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, राहुल महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वकील सय्यद गौरव नायकवडी, वैभव शिंदे, पैलवान भीमराव माने, पुंडलिक जाधव, भाजपचे विक्रम पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली जिह्यांतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप पक्ष, रयत क्रांती संघटना, महाराष्ट्र क्रांती सेना आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भेंडीची भाजी… लसणाचा ठेचा
या सभेत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तांबडा-पांढरा रश्श्याचा उल्लेख केला. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, आम्ही  भेंडीची भाजीवाले माणसे आहोत असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करीत, आम्ही लसणाचा ठेचा खाणारे आहोत. लसणाचा ठेचा कसा वापरायचा हे आम्हाला चांगलेच माहीत आहे असे सांगितले.

शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आता वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांबरोबर
शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आता वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांबरोबर आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यावर केला. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना साथ देणार आहात का, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले. धैर्यशील मानेसारख्या उमदय़ा तरुणाला मी उमेदवारी दिली आहे.

युती आणखी घट्ट झाली आहे
मतभिन्नता होती ती गाडून युती झाली आहे. रोखठोक आणि उघड युती केली आहे. 25 वर्षे नव्हती तेवढी घट्ट युती आता झाली आहे, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.