
सामना प्रतिनिधी । जालना
तरुणींना चित्रपटात हिरॉईन करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन लुबाडणूक करणाऱ्या हरी सॅप या भामट्यास सदर बाजार पोलिसांनी नाशकात जाऊन गजाआड केले. त्याची चौकशी केली असता जालन्याप्रमाणे राज्यात व राज्याबाहेरही तरुणींना हिरॉईन बनविण्याचे स्वप्न दाखवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या पैशातून तो पंचतारांकित हॉटेलात राहून मौजमजा करायचा, अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी फसवणूक झालेल्या मुलींची चौकशी केली असता सॅपविरुद्ध बंगळूर, ग्रेटर नोयडा येथेही गुन्हे दाखल झाले आहेत.
जालन्यातील एका तरुणीने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी इंग्रजी वृत्तपत्रात सुनील बोरा अॅण्ड इम्पॅक्ट फिल्मतर्फे रॅम्बो चित्रपटात सहनायिका पाहिजे म्हणून जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला बळी पडून तरुणीने हॅरी सॅप याच्याशी संपर्क साधला असता त्याने चित्रपटात हिरॉईन करण्याचे आमीष दाखवीत कंपनीकडे चार्ज भरण्याची सूचना केली. त्यानुसार ४ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केला. परंतु काम मिळाले नसल्याने तरुणीने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून उपनिरीक्षक जयसिंह परदेशी, पोकॉ. फुलचंद गव्हाणे, कृष्णा तंगे यांच्या पथकाने नाशकात जाऊन त्या भामट्याला बेड्या ठोकल्या.






























































