श्रीगणेश अन् योगसाधना

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
प्रथम पूज्य विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन!

श्री गणेश आणि योगाभ्यास यांचा संबंध याची माहिती घेऊया. श्री गणेश म्हणजे योगेश्वर भगवान शंकरांचे पुत्र. श्रीगणेश हा स्वयं ओंकार स्वरूप आहे. गणेशाचे स्वरूप हे ओंकार रूपच आहे आणि म्हणूनच योगी ज्याचे निरंतर ध्यान करतात अशा गणेशाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण वंदन करू.

योगाभ्यासामध्ये सात चक्र मानलेली आहेत. सर्वात प्रथम आणि शरीराच्या सर्वात खाली येते ते मुलाधार चक्र. या मुलाधार चक्राची देवता ही श्री गणेश आहे. मुलाधार चक्रावरती नियंत्रण मिळवल्यास आपण आपल्या मनातील भावभावना आणि विकार यावरती नियंत्रण मिळवू शकतो. अथर्वशीर्षमध्ये गणेशाचे वर्णन करताना म्हटलेले आहे… त्वं गुणत्रयातीतः। त्वं अवस्थात्रयातीतः।

अर्थात सत्व रज आणि तम या तीन गुणांच्याही पलीकडे असलेला गणेश म्हणजेच ईश्वर होय. योगाभ्यासामध्ये किंवा अध्यात्म शास्त्रामध्ये जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीअशा मनाच्या तीन अवस्था मानलेल्या आहेत. या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेला भगवान म्हणजेच श्री गणेश.

तुंदिलतनु परी चपळ साजिरी
भगवान गणेशाचे स्थूल स्वरूप हे गजमुख, एकदंत, लंबोदर असले तरी गणेशाचा एक विशेष म्हणजे त्याची लवचिकता आणि चपळपणा. शरीर जरी स्थूल असले तरी श्री गणेश स्वयं मात्र अत्यंत चपळ आहे, लवचिक आहे. आणि हीच चपळता आणि लवचिकपणा योगाभ्यासामुळे आपल्याला मिळते अंगलाघवत्व हे योगाभ्यासाचे आणखी एक उद्देश आहे. योगाभ्यासामध्ये सहाय्य करण्यासाठी यश देण्यासाठी गणेशाची प्रार्थना करूया.

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
अथर्वशीर्षामध्ये म्हटलेले आहे की योगी नित्य भगवान श्री गणेशाचे अर्थात त्याच्या ओंकार स्वरूपाचे ध्यान करतात. अथर्वशीर्षामध्ये भगवान श्री गणेशाचे भौराणिक सुंदर वर्णन दिलेल्या आहे आणि या परिणामप्रमाणे श्री गणेशाचे ध्यान जो योगी करतो त्याला श्रेष्ठ योगी असे म्हटलेले आहे एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ?

भद्रासन
भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय असणारे हे आसन. भगवान शंकरांनी मनुष्याला 84 लक्ष प्रकारची आसने सांगितली. त्यातील सारभूत किंवा श्रेष्ठ अशी चार आसने म्हणजे जेव्हा सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. भगवान गणेशाच्या अष्टविनायकांमधील आणि इतरही देवळांमधील मूर्ती या मुख्यत्वे भद्रासनातच विराजमान झालेल्या दिसून येतात.
– सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर, www.bymyoga.in