
भोंग्यासंदर्भात एक राष्ट्रीय धोरण तयार करा आणि संपूर्ण देशात लागू करा, हे धोरण लागू करत असताना कोणतीही दुटप्पी भूमिका घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. हे धोरण तयार केल्यानंतर ते सगळ्यात पहिले ते बिहार, युपी, दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. तुमच्यात हिम्मत असेल तर हे धोरण बनवा आणि त्यावर सक्तीने अंमल सुरू करा असं राऊत यांनी कडक शब्दात सांगितले आहे.
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली सुरु झालेले राजकीय भोंगे हे ढोंग असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. भोंगे कोणतेही असोत; मशिदीवरील, मंदिरांवरील अथवा सभेतील, केंद्र सरकारने एक धोरण निश्चित करावे, दिशानिर्देश द्यावेत आणि कायदा करावा असे राऊत यांनी म्हटले. केंद्राने गोवंश हत्याबंदीचा कायदा बनवला आणि काही राज्यांनी त्यातून पळवाट शोधली. ईशान्येकडील राज्ये गोवंश हत्याबंदी मानायला तयार नाहीत, भाजपच्या अधिपत्याखाली असलेलं गोव्यासारखं राज्यही गोवंश हत्याबंदी मानायला तयार नाही मात्र इतर राज्यांवर भाजप सरकारने दबाव आणला. असं असं दुटप्पी धोरण भोंग्यांच्या बाबतीत चालणार नाही असं राऊत यांनी बजावून सांगितले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर हे धोरण बनवा आणि त्यावर सक्तीने अंमल सुरू करा . यासंदर्भातील राष्ट्रीय धोरण तयार करून ते पहिले बिहार, युपी, दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा, महाराष्ट्र हे कायद्याचे पालन करणारे राज्य आहे आम्ही त्याचे पालन करू असे राऊत यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे
भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना ऐकवली बाळासाहेबांची आठवण
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भोंग्याबाबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. बाळासाहेबांनी रस्त्यावर नमाज पढण्यास सक्त विरोध केला होता. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेबांनी मुस्लिम मौलवी यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आपण रस्त्यावर नमाज पढू देणार नाही कारण आपण जनतेला तसे वचन दिले आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. मात्र त्याचवेळी तुम्ही रस्त्यावर नमाज का पढता? असा सवालही विचारला होता. यावर मौलवींनी मशिदीत जागा कमी असल्याने आम्हाला रस्त्यावर नमाज पढावा लागतो असं सांगितलं होतं. यानंतर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना बोलावून घेतलं होतं. बाळासाहेबांनी या दोघांना सांगितलं की, रस्त्यावरील नमाज बंद करायचे असतील तर मुस्लिम मौलवी आणि नेते यांची भूमिका , मागणी याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. यानंतर मशिदींचा एफएसआय वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे रस्त्यावरचे नमाज पठण बंद झालं होतं. भोंगे लावून, गोंगाट करून चालत नाही राजकारण्याला यातून तोडगा काढावा लागतो, तो तोडगा काढण्याची हिम्मत शिवसेनेत आणि बाळासाहेबांमध्ये होती याची आठवण राऊत यांनी सध्या भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना करून दिली.




























































