
देशात हुंडाबळीविरोधात कायदे करूनही हुंड्यावरून तरुणींचे जीव जाण्याचे प्रकार घडत असल्याचं चित्र आहे. प्रेमविवाह ठरलेल्या एका तरुणीने होणाऱ्या नवऱ्याने हुंडा मागितला म्हणून आत्महत्या केली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील बदायूं येथे घडली आहे. या घटनेतील तरुणीचं नाव शमां असं आहे. तिचा निकाह अतीक नावाच्या तरुणाशी ठरला होता. शमा आणि अतीक यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमाचं रुपातंर लग्नात करण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांनी घेतला. 17 मार्च रोजी त्यांचा साखरपुडा ठरवण्यात आला.
पण, साखरपुड्याच्या आधी अतीकने काही अटी शमासमोर ठेवल्या. त्या पूर्ण केल्या तरच हा निकाह होईल, असं त्याचं म्हणणं होतं. यात पैशांची मागणीही करण्यात आली होती. पण, ही मागणी पूर्ण करू न शकल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाले. हा वाद गावच्या पंचांसमोर गेला.
तेथे पंचायतीसमोर अतीकने शमासोबत लग्नाला नकार दिला. अतीकचं हे वागणं पाहून शमाला धक्का बसला. पंचायत सोडून ती घरी आली आणि तिने तिच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
शमाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी अतीक आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा मागणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अतीक सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.




























































