>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
मणिपुरी नृत्य शास्त्रीय नृत्यातील सर्वात सुंदर नृत्य प्रकार आहे. शरीराच्या आणि पायाच्या हालचालीप्रमाणेच मणिपुरी नृत्यात चेहऱयावरील हावभावही सूक्ष्म असावे लागतात. मणिपुरी नृत्याची उत्पत्ती उत्तर पूर्व भागातील मणिपूरमध्ये झाली. त्याच्या उत्पत्ती स्थानावरूनच मणिपुरी हे नाव या नृत्य प्रकाराला पडले.
या नृत्य प्रकाराची दंतकथा अशी आहे की, ईश्वराने पृथ्वीचे निर्माण केले तेव्हा ती एका पिंडी समान होती. तेव्हा सात लैनुराह यांनी त्यावर नृत्य केले आणि त्याला मजबूत बनविण्यासाठी कोमलतापूर्वक आपल्या पायाने त्यावर दाब दिला. म्हणूनच मणिपुरी नृत्यात पाय जमिनीवर ठेवताना कोमलतापूर्वक, मृदुतापूर्वक ठेवले जातात. मणिपुरी नृत्यात महिला या र्हास नृत्य करतात ते बॅले किंवा एकल नृत्याचे एक रूप असते, तर पुरुष हे संकीर्तन नृत्य करताना मणिपुरी ढोलकच्या तालावर पूर्ण शक्तीनिशी नृत्य करतात.
मणिपुरी नृत्यशैलीचे मुख्य प्रमुख आकर्षण त्यांचा रंगीबिरंगी पोशाख असतो. त्याला पतलोई असे म्हणतात आणि लेहंग्याला क्युमिन असे म्हणतात. यावर मिरर वर्क व जरी वर्क केलेले असते. तसेच यावर घातला जाणारा ब्लाऊज हा वेलवेटचा असतो. जास्त करून या ड्रेससाठी सिल्क कपडा किंवा मग कॉटनचा कपडाही वापरला जातो.
मणिपुरी नृत्य कलाकार गोल्ड ज्वेलरी जास्त घालतात तसेच गळय़ात कोलू हार घालतात. चेहरा, पाठ, पंबर, हात आणि पाय गोल दागिन्यांसह किंवा ड्रेसच्या बरोबर फुलांच्या माळांनी सजवतात. तसेच हे नृत्य सादर करताना पैंजण तसेच पायात घातले जाणारे दागिने यांचा वापर केला जातो. मरई, झापा, कानात फुले, हळदी पान, पंगन अशा प्रकारचे दागिने नृत्यशैली सादर करताना घातले जातात.
काळानुसार मेकअप बदल…
मणिपुरी नृत्याच्या मेकअपचा बेस हा इतर नृत्यशैलीप्रमाणेच केला जातो. मात्र मणिपुरी नृत्यांगनांचे डोळे थोडे बारीक असल्यामुळे डोळय़ांचा मेकअप करताना काळजी घेतली जाते. अलीकडे आयलाइनर लावण्याची पद्धत रूढ होत चालली असून अनेक वेळा हायलाइटर्सचाही वापर केला जातो. तसेच कपाळावरील चंदनाचे गंध काढताना ते नाकापर्यंत काढले जाते. त्यामुळे नाकाचा शेंडा किंवा नाक व्यवस्थित तरतरीत दाखविण्यासाठी डार्क शेडचा वापर केला जातो. तसेच गालावरील रूज जास्त डार्क न करता थोडे नाकापर्यंत आणावे लागते. कारण अनेक वेळा चिक बोन्स हे फार नसल्यामुळे ते असल्याचा आभास निर्माण केला जातो. लिपस्टिक शेड्स डार्क रंगातच लावल्या जाता, तर अनेक वेळा पुरुष पात्रांसाठी मात्र हलकीशी शेड वापरली जाते. या नृत्यशैलीमध्ये कपाळावरील चंदन तिलकाला खूप महत्त्व असते.