
लॉक डाऊन शिथील करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रासह गोवा दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांतील सर्व कनिष्ठ न्यायालये उद्या 8 जूनपासून सुरू होणार आहेत. मर्यादित कर्मचारी वर्ग आणि दोन पाळ्यांवर कनिष्ठ न्यायालय सुरू करण्याची परवानगी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीनी दिली आहे तसे परिपत्रकच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिका तसेच राज्यभरातील अन्य दहा महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ न्यायालयांना दोन पाळ्यात प्रत्येकी 15 टक्के वेगवेगळे आणि उर्वरित राज्याच्या भागांतील कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशा दोन सत्रात मर्यादित कर्मचारी वर्गासोबत सुरू करावे. जिल्ह्यांचे प्रधान न्यायाधीश संबंधित घटकांशी चर्चा करून कामकाजाच्या वेळा बदलू शकतील. जास्तीत जास्त कामे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात यावीत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. कोर्टात गर्दी होणार नाही म्हणून सुनावणीच्या प्रकरणांचा बोर्ड तयार करून निकाल जाहीर करण्याची प्रकरणे बोर्डावर लावण्यास प्राधान्य द्यावे. न्यायाधीशांसाठी पेâस शील्ड किंवा पारदर्शक अॅक्रिलिक शीट उभारावी. नवीन प्रकरणे दाखल करून घेण्यासाठी इमारतीच्या तळमजल्यावरच व्यवस्था करावी. प्रत्येक पक्षकाराला विशिष्ट वेळ देणारी टोकन पद्धत अवलंबावी. नव्या फायली किमान 72 तास अलगीकरणात ठेवाव्यात. न्यायालयातील एकच गेट सुरू ठेवावे. प्रवेश करताना सामाजिक अंतर राखावे, प्रत्येकाच्या तोडांला मास्क अनिवार्य, आवश्यक ठिकाणांवर हँड सॅनिटायझर, लिक्विड साबण ठेवावे, प्रवेशद्वारावर टेम्परेचन गनद्वारे थर्मल स्कॅनिंग करून आत सोडावे, संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचनांचे पालन करण्यात यावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.























































