
लोअर परळचा डिलाईल रोड पूल धोकादायक ठरवून तीन वर्षांपूर्वीच पाडण्यात आला. कोरोनाच्या लाटेमुळे ऑक्सिजन सिलिंडर टंचाईअभावी 2020 मध्ये या पुलाचे काम रखडले असतानाच पंधरवडय़ापूर्वी शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंकच्या वरळी कनेक्टरचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जगन्नाथ भातणकर मार्ग वाहनांसाठी बंद केल्याने सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहने व पादचारी एल्फिन्स्टन रोड ब्रिज नाक्यावर खिंडीत अडकले जात आहेत.
लोअर परळचा डिलाईल रोडचा पूल रेल्वे अणि आयआयटीतज्ञांनी सेफ्टी ऑडिटमध्ये धोकादायक ठरविल्याने पश्चिम रेल्वेने 2 फेब्रुवारी 2019 रोजी तो पाडला. हा पूल 24 जुलै 2018 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे तीन जोड भाग असून दोन भाग पश्चिम बाजूला आहेत. या पुलाच्या प्रत्येक गर्डरचे वजन तब्बल 1800 टन आहे. त्यामुळे कोटाहून सुटे भाग आणून उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूला जोडण्यात येऊन ते पुढे पुढे सरकवत बसविण्याचे काम सुरू होते; परंतु गर्डरच्या डिझाईनचा अंदाज चुकल्याने हे फॅब्रिकेशनचे काम आयआयटी तज्ञांच्या सल्ल्याने पुन्हा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
दादरचा टिळक पूलही वाटेवर
रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पालिकेने बांधायचे की रेल्वेने असा वाद निर्माण झाल्याने महाराष्ट्र रेल इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे मुंबईतील रेल्वे हद्दीतील जुन्या उड्डाणपुलांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. दादरचा टिळक पूल प्रथम तोडण्यात येणार असून त्यानंतर रे रोड तसेच भायखळ्याचा उड्डाणपूलही पाडण्यात येऊन केबल आधारित नव्या पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे ब्रिटिशकालिन पूल 127 ते 129 वर्षे जुने असून त्यांचे आयुष्य संपल्यात जमा आहे. या पुलांच्या वरील आणि खालील बाजूच्या वीज, पाणी, गॅस, टेलिफोन वाहिन्या हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुलांचे डिझाईनही पूर्ण झाले आहे. पाइल टेस्टिंगचे काम सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल यांनी सांगितले.
रुग्णवाहिकेलाही बसतोय फटका…
प्रभादेवी स्थानकात जर दुर्दैवाने एखादा अपघात घडला तर रुग्णवाहिकेलाही वाहतूककोंडीचा फटका बसत असल्याने प्रवाशांच्या प्राणावरच बेतत आहे. गेली तीन ते चार वर्षे करी रोडला जाणाऱया प्रवाशांना पायी चालत स्थानक गाठावे लागत आहे. करी रोडने एल्फिन्स्टनला वाहनांनी जाणाऱयांना महालक्ष्मी किंवा परळ पुलावरून फिरून यावे लागत आहे.



























































