
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम रेल्वेचा लोअर परळ येथील धोकादायक ठरविण्यात आलेला डिलाईल पूल कोणी बांधायचा याचा वाद संपुष्टात आला आहे. या पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग रेल्वेने तर पालिकेच्या हद्दीतील भाग पालिकेने बांधण्याचे ठरले आहे. मात्र, रेल्वे हद्दीतील भाग दहा महिन्यांत बांधावा, असे आदेश रेल्वे बोर्डाने दिल्याने नवाच तिढा निर्माण झाला आहे.
लोअर परळ पुलाचा धोकादायक भाग पाडण्याचे काम हाती घेतले असतानाच आता हा भाग 10 महिन्यांत उभारण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने दिल्या आहेत. 10 महिन्यांत हा पूल उभारण्याचे शिवधनुष्य पश्चिम रेल्वेला पेलवेल काय, असा सवाल आता निर्माण झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या अवघड असणारा हा पूल पाडण्यासाठीच किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अशा वेळी 10 महिन्यांत रेल्वेचा पूल कसा बांधला जाणार याबाबत चर्चा सुरू आहे.


























































