
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत दर्जा सेमेनिस्तजा, लानलाना तारारुडी, हॅनी वंदीविकल, इरी शिमिजू, लिली टाग्गीर, फेंग्रान तियान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, सहजा यमलापल्ली, वैष्णवी आडकर, माया राजेश्वरन रेवती यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित लात्वियाच्या दर्जा सेमेनिस्तजाने इटलीच्या दिलेट्टा चेरुबिनीवर ६-३, ६-१ असा विजय मिळवला. जपानच्या इरी शिमिजू हिने हिंदुस्थआनच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या सहजा यमलापल्लीचा ७-५, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना १ तास ५० मिनिटे चालला. रशियाच्या क्रिस्टियाना सिडोरोव्हा हिने हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीचा ६-१, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. हा सामना जवळपास १ तास १२ मिनिटे चालला.
सातव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या लिली टाग्गीर हिने हिंदुस्थानच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकरचे आव्हान ७-५, ६-४ असे संपुष्टात आणले. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या मोरोक्कोच्या यास्मिन कब्बाज हिने थायलंडच्या पेंगतारण प्लिपुचचा ६-३, ६-३ असा पराभव केला. रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हा हिने इंडोनेशियाच्या प्रिस्का न्यूग्रोहोला ६-२, ६-१ असे पराभुत केले. थायलंडच्या पाचव्या मानांकित लानलाना तारारुडी हिने हिंदुस्थानच्या माया राजेश्वरन रेवतीचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.





























































