लखनऊमध्ये भीषण आग, आगीत दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू तर चार जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या काकोरी येथील हाता हजरत साहेब परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दोन मजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली आहे. जखमींना केजीएमयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

मुशीर अली (50, रा. हाता हजरत साहेब) हे जरदोसीचे काम करण्यासोबतच फटाक्याचा व्यवसाय करत होते. मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. घरातील लोक बाहेर येईपर्यंत आग घरभर पसरली. यात मुशीर अली (50), पत्नी हुस्ना बानो (45), भाची रइया (5), हिबा (2) और हुमा (3) यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. याचबरोबर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात अडकलेल्या मुशीर यांच्या दोन मुली, इंशा (16) आणि लकाब (18) आणि मेहूणा अजमत (30) आणि भाची अनम (17) यांची सुटका केली. चौघांनाही ट्रॉमामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुशीर अली हे फटाके विक्रेते होते आणि ही आग घरात ठेवण्यात आलेल्या विस्फोटक सामग्रीमुळे लागली आहे.