
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या एका आश्रमात साध्वीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार साधकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आश्रमात राहायचं असेल तर हे सर्व सहन करावं लागेल अशी धमकी या आश्रमाच्या महंताने दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
पीडिता ही मूळची प्रयागराज येथील करछनाची रहिवासी आहे. ती पूर्वी साध्वी म्हणून मथुरेच्या रुक्मिणी बिहार आश्रमात राहत होती. एक वर्षापूर्वी ती प्रयागराजमधील माघ यात्रेसाठी गेली होती. तिथे तिची भेट एका साध्वीशी झाली. त्या साध्वीने तिला सांगितलं की ती लखनौच्या गोमतीनगर येथे जानकी मंदिर आश्रमात राहते. यात्रा संपल्यानंतर त्या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. त्यामुळे श्रावणात सदर साध्वीने पीडितेला सांगितलं की तिच्या आश्रमातील महंतांनी तिला (पीडितेला) आश्रमात राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानंतर पीडिता लखनौच्या आश्रमात राहायला आली.
पीडितेच्या आरोपांनुसार, ऑक्टोबर महिन्यात तिची तब्येत बिघडल्याने ती काही साधकांसोबत वाराणसी येथे आली. तिथे दुर्वास नावाच्या साधकाने तिला अंमली पदार्थ खाऊ घातला. तो खाल्ल्याने ती बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच वेळी दुर्वास, छोटे मौनी, बडे मौनी आणि मनमोहन दास हे चौघे तिच्या आसपास होते. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली.
पीडितेने याची तक्रार आश्रमाचे महंत हनुमान दास यांच्याकडे केल्यानंतर महंताने आरोपींना वाचवायचा प्रयत्न केला. पीडितेला आश्रमात राहायचं असेल तर तिला हे सर्व सहन करावं लागेल, असंही महंत म्हणाल्याचा आरोप पीडितने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.




























































