IPL 2024 : लखनऊने चेन्नईही जिंकले; स्टॉयनिसच्या वादळापुढे चेन्नई उडाली

चार दिवसांपूर्वी लखनऊने एकानावरही चेन्नईला नमवले होते आणि आज चेन्नईच्या चेपॉकवरही त्यांचीच दादागिरी चालली. मार्कस स्टॉयनिसच्या 63 चेंडूंतील 124 धावांच्या नॉनस्टॉप झंझावातापुढे चेन्नईचे गोलंदाज अक्षरशः उडून गेले. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 108 धावांच्या जोरावर चेन्नईने 4 बाद 210 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती तर स्टॉयनिसने विजयी लक्ष्य 3 चेंडू आधीच गाठत लखनऊला पाचवा विजय मिळवून दिला. आता लखनऊ दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर असून चेन्नई पाचव्या स्थानावर घसरला आहे.

चेन्नईच्या 211 धावांचा पाठलाग करताना लखनऊची दमछाक होईल, असे वाटत होते. चेन्नईच्या दीपक चहरने आपल्या तिसऱयाच चेंडूवर क्विंटन डिकॉकचा त्रिफळा उडवत जबरदस्त सुरूवात केली. पुढे राहुलही (16) लवकर बाद झाला. 2 बाद 33 अशा खराब सुरुवात झालेल्या लखनऊला मार्कस स्टॉयनिसच्या झंझावाताने सावरले, पण लखनऊची धावसंख्या मंदावली. स्टॉयनिसने तिसर्या विकेटसाठी 55 धावांची भागी रचली, पण 11 षटकांत धावांचे शतकही पूर्ण न केलेल्या लखनऊने 88 धावाच केल्या होत्या आणि त्यांना 54 चेंडूंत 123 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. तेव्हा स्टॉयनिसने निकोलस पूरनसह 70 धावांची भागी रचली आणि मग दीपक हुडाच्या साथीने 18 चेंडूंत 55 धावा ठोकत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने आपले शतक 56 व्या चेंडूवर साकारले. त्याने आज 13 चौकार आणि 6 षटकार खेचले.

त्याआधी ऋतुराज गायकवाडच्या 60 चेंडूंतील 108 धावांच्या खेळीने चेन्नईला सावरले होते. पहिल्या षटकात अजिंक्य रहाणे (1) बाद झाल्यावर गायकवाडने 45, 52, 104 अशा तीन महत्त्वाच्या भागीदाऱया केल्या. गायकवाडने आपल्या खेळीत 3 षटकार मारले होते, पण दुबेने 27 चेंडूंत 7 षटकार खेचत 66 धावा ठोकल्या. या भागीमुळेच चेन्नई 210 पर्यंत पोहोचू शकली.