
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी मला काहीच आठवत नसल्याचे म्हटले आहे. पत्रकार प्रिया रमाणी यांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्याप्रकरणी न्यायालयात शनिवारी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी रमाणी यांच्या वकिलाने विचारलेल्या प्रश्नांवर मला काहीच आठवत नाही, असे त्यांनी उत्तर दिले.
एम.जे. अकबर यांची जवळपास दोन तास न्यायालयात चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. लैंगिक शोषणाचे आरोप हे दुर्दैवी व मानहानिकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मी टू’ अभियानात सहभाग नोंदवत प्रिया रमाणी यांनी अकबर यांच्यासोबत एका वृत्तपत्रात काम करताना आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता.























































