रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच मशीन बंद पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना जाब विचारतांना युवा सैनिक

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग जिल्हा रुग्णालयात शशीनाथ पाटील या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना अचानक मशीन बंद पडल्याने शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्याने रुग्णाचे नातेवाईक, युवा सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी याबाबत गोंधळ घालून जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांना धारेवर धरले. डॉ. अजित गवळी यांनी सायंकाळपर्यंत शाशीनाथ याच्यावर ओपन शस्त्रक्रिया केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ थांबला. मात्र शस्त्रक्रिया सुरू असताना मशीन बंद पडल्याने जुन्या झालेल्या मशीनचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

शशीनाथ पाटील रा. मानकुळे-अलिबाग, हा पाच दिवसापूर्वी गावात क्रिकेट खेळताना पडून त्याच्या डाव्या पायाला दुखापत होऊन हाड बाहेर आले होते. या अपघातानंतर शशीनाथ याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर पाच दिवस रुग्णालयातील डॉक्टर बडगिरे हे उपचार करीत होते.

दि. 16 जानेवारी रोजी शशीनाथ याच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. शशीनाथ याच्या पायावर शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर काही वेळातच मशीन बंद पडली. मशीन बंद पडल्याने पुढील शस्त्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया होणार नाही, असे शशीनाथ यास व नातेवाईकांस सांगितले. त्यानंतर त्याला सर्जिकल वार्डात हलविण्यात आले.

शस्त्रक्रिया सुरू असताना मशीन बंद कशी पडली, असा जाब विचारत युवा सेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिक, नातेवाईक यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या नंतर जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला. डॉ. अजित गवळी यांनी स्वत: सर्जिकल वार्ड मध्ये येऊन माहिती घेतली व सायंकाळपर्यत ओपन शस्त्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ थांबला.

शस्त्रक्रिया गृहात एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेताना सर्व तयारी योग्य आहे का, मशीन व्यवस्थित सुरू आहे का हे पाहण्याचे काम रुग्णालायातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे असते. मात्र शस्त्रक्रिया सुरू असताना मशीन बंद पडत असेल तर याबाबत रुग्णालय प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी बंद, डॉक्टर, परिचारिका यांची कमतरता त्याचबरोबर शस्त्रक्रिया मशीनही आता बंद पडत असल्याने येणाऱ्या रुग्णावर उपचार कसे होणार हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून रुग्णालय प्रशासनाकडून नेहमी आम्ही शासनाला कळविले आहे, हेच उत्तर मिळत आहे.

शशीनाथ याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक मशीन बंद झाल्याने शस्त्रक्रिया बंद करण्यात आली. याबाबत पाटील यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली होती. मशीन जुनी झाली असून ती बदलणे गरजेचे आहे. याबाबत वारंवार संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मशीन बंद पडली असल्याने ओपन शस्त्रक्रिया शशीनाथवर करण्यात येणार आहे. – डॉ. बडगिरे