आरोप करण्यापेक्षा मतदान करा!

1079

>> माधव गोठोस्कर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुंबईसह सर्व शहरांतील जनतेने मतदान करून आपला हक्क बजावावा. मी आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांत मतदान केले आहे. 1951 साली पहिल्यांदाच लोकसभेसाठी, तर 1962 साली पहिल्यांदाच विधानसभेसाठी मतदान झाले होते. मी मतदान केले नाही असे एकदाही झाले नाही. कोणत्याही पक्षावर आरोप करण्यापेक्षा आपण मतदान करण्याचे कर्तव्य पूर्ण करावे.

माझ्या कारकीर्दीत मी महाराष्ट्राचे 18 मुख्यमंत्री डोळ्यांनी पाहिले आहेत. यामध्ये 12 मराठा, तीन ब्राह्मण, एक मुसलमान, एक ओबीसी व एका गुजराती मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. महाराष्ट्रासह देशात सुरू झालेल्या निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेस या पक्षाचे वर्चस्व होते. त्याकाळात जास्त पक्षही नव्हते. आता मात्र बरेच पक्ष निवडणुकीसाठी रिंगणात उतरताहेत.

जनतेला राज्यासह देशामध्ये परिवर्तन हवे होते. अखेर शिवसेना-भाजप यांची सत्ता 1995 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आली. तसेच त्यानंतर 2014 सालामध्ये पुन्हा या युतीनेच बाजी मारली. यंदाही लोकसभेत युतीचाच वरचष्मा दिसून आला.

ईव्हीएमवर विनाकारण आरोप

छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएमवर कोणतेही आरोप केले नाहीत. देशामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडण्यात आले. हे योग्य नाही. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे लोकमान्य टिळकांचे वाक्य यावेळी सर्वांनाच लागू पडते. मतदान हा आमचा हक्क असून तो आम्ही मतदान करून पूर्ण करणारच असे जनतेने म्हणायला हवे. अन्यथा विनाकारण आरोप करू नयेत.

शिवसेनाभाजप युती छान काम करतेय

शिवसेना-भाजप हे मिळून छान कामे करताहेत. काँग्रेसच्या सत्तेत ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न यावेळी युतीकडून करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता विरोधी पक्षही तेवढा स्ट्राँग नाहीए.

(टीप ः लेखक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या