पुणे बाजार समितीच्या प्रशासकाविरोधात पोलिसांत तक्रार, 94 लाखांची फसवणूक केल्याचा ठेकेदाराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. जोग कन्स्ट्रक्शनतर्फे ही तक्रार करण्यात आली आहे. पुणे मार्केट यार्डात करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचे सुमारे 94 लाख रूपयांचे बिल मूळ ठेकेदाराला न देता परस्पर दुसऱ्याच खात्यात जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. जोग कन्स्ट्रक्शनतर्फे जगदीश जोग यांनी ही तक्रार दिली आहे.

जोग कन्स्ट्रक्शनचे प्रा.लि या कंपनीला पुणे मार्केट यार्डातील डांबरीकरण कामाचा ठेका मिळाला होता. डांबरीकरणाच्या कामापोटी जोग कन्स्ट्रक्शन कंपनीचे 94 लाखांचे बिल प्रशासक व इतर व्यक्तींनी संगनमत करून अर्जदार जोग यांच्या खात्यात जमा न करता खोटी कागदपत्रे, शिक्के तयार करून दुसऱ्याच खात्यात जमा केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे जोग कन्स्ट्रक्शनचे म्हणणे आहे. रकमेचा अपहार करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोग यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देण्यात आली असून, ही तक्रार मिळाल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले.

पुणे बाजार समितीत नियमबाह्य टेंडरवाटप, ठेकेदारांकडून होणारी शेतकरी आणि वाहनचालकांची लूट, कोट्यवधींची सेसगळती, वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या जोरावर कारभार हाकणे आदी प्रकार सुरू असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. याबाबत पणन संचालकांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचाही आरोप आहे. हे आरोप केले जात असतानाच जोन कन्स्ट्रक्शनकडून करण्यात आलेल्या 94 लाख रूपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे.