मी वेगळी : समाजाचं देणं

74

>> मधुमती केंघे, नाशिक

मी पाच वर्षांची असताना राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात होते. ती शाखा आमच्या गल्लीत भरत असे. शाखेत सानेगुरुजींच्या, महात्मा गांधींच्या, जोतिबा फुले, देशभक्त बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस अशा देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या जात. त्या ऐकून माझ्या मनावर संस्कार झाले ते समाजसेवेचे. घरातही समाजसेवेचे संस्कार होतेच. त्यामुळे मला समाजसेवेची आवड होती.

विवाहानंतरही मी माझं समाजसेवेचं काम सोडलं नाही, पण घर सांभाळून, गरीब गरजू विद्यार्थी, अनाथ मुलं, विधवा महिला, दिव्यांग मुलं, वृद्ध माणसं यांना अडीअडचणीच्या वेळी मदत केली. ही व्यक्तिगत मदत होती. परंतु नाशिक महानगरपालिकेने माझ्या कामाची दखल घेत 1999 साली ‘लोककल्याण पुरस्कार’ हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते मला प्रदान केला. पुरस्काराचा आनंद होताच, परंतु त्याहून मी जेव्हा गरजू व्यक्तींना मदत करीत असे त्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद मला लाखमोलाचा वाटे तोच पुरस्कार.

मधल्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमातून (हार्मोनियमची साथ मी अनेक गायकांना केली). मिळणारे मानधन मी घरी खर्चून करता त्यात माझ्या वाढदिवसाचे पैसे जमा करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं फी यावर खर्च करीत असे. अपंगांसाठी मी मोफत कार्यक्रम करीत असे. अन्य सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळालेले मानधन अपंगांसाठीच खर्च करीत असे.

चित्रकलेची आवड असल्यामुळे चित्रकलेच्या माध्यमातून मी समाजसेवा करू लागले. ती चित्र वृक्षसंवर्धन करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासंदर्भात असे. ती चित्रे काढून त्यात वृक्षसंवर्धनासंबंधी प्रदूषणासंबंधी संदेश लिहीत असे. अशी चित्रे वाढदिवस, लग्न समारंभ, वास्तुपूजा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांत ती चित्रे भेट म्हणून देत असे. जेणेकरून समाज प्रबोधन होईल. माझं वय जरी झालं असलं तरी मी ते मानत नाही. अजूनही मी घरी निसर्गचित्र काढून त्यातून निसर्ग वाचवा संदेश देत असते. हे काम पूर्ण करायला परमेश्वराने तसे सामर्थ्य द्यावे हीच इच्छा.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या सार्‍यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या