
राज्यसभा निवडणुका संपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी भाजप नेत्यांत भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबाबतचा निर्णय दिल्लीतूनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वल्लभ भवनमध्ये मध्य प्रदेशमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, संघटनेचे महामंत्री सुहास भगत आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री चौहान यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबतची चर्चा अद्याप बाकी असून मंत्र्यांच्या संभाव्य नावावर दिल्लीतच शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपमध्ये जातीभेद होत असल्याचा काँग्रेसचा आरोप
भाजपमध्ये जातीभेद होत आहे. अनुसूचित जाती-जमातीचे नेते व कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे संदीप मालविय यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक माजी मंत्री प्रभुराम चौधरी हे भाजप संघठन मंत्री आशुतोष तिवारी यांच्यासोबत जेवण करत असताना चौधरी यांना डिस्पोजल प्लेट देण्यात आली तर तिवारी यांना स्टीलचे ताट देण्यात आल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. यावरून युवक काँग्रेसने भाजपवर निशाणा साधत जातीभेदाचा आरोप केला आहे.


























































