केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना मातृशोक

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आई माधवी राजे सिंधिया यांचे बुधवारी एम्समध्ये निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजून 28 मिनीटांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 70 वर्षांच्या होत्या. माधवी सिंधिया मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वेंटिलेटरवर होत्या.

माधवी राजे सिंधिया यांच्यावर मागच्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते आणि त्यांना निमोनियासोबत त्या सेप्सिस ग्रस्त होत्या. मागच्या महिन्यात त्यांची जास्त तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिव शरीराला अंतिम संस्कारासाठी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

माधवी राजे नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. 1966 मध्ये त्यांचा विवाह माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांच्याशी झाला होता. माधवीराजे यांचे आजोबा जुद्ध समशेर बहाद्दुर हे नेपाळचे पंतप्रधान होते. लग्नापूर्वी माधवी राजेंचं नाव राजलक्ष्मी असं होतं.