भयंकर! कुत्र्याच्या पिल्लाला जमिनीवर आपटले, नंतर पायाने चिरडून केली हत्या

मध्य प्रदेशमधील गुना शहरातील माथेफिरूने एका कुत्र्याच्या पिल्लाला जोरात जमिनीवर आपटले. एवढे करूनही ते पिल्लू जिवंत राहिल्याने त्याने चक्क पायाने त्याला चिरडले. या हल्ल्यात त्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील दखल घेतली असून आरोपीवर तत्काळ कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी काही तासातच त्या नराधमाला अटक केली आहे.

20 सेकंदाच्या या व्हिडीओत तो माथेफिरू एका दुकानाबाहेर बसलेला दिसत आहे. रस्त्यावर असलेली कुत्र्याची दोन छोटीशी पिल्ल त्याच्या जवळ जातात. त्यांना पाहून तो माथेफिरू चिडतो व त्यानंतर त्यातील एकाला तो उचलतो व रस्त्यावर जोरात फेकतो. एवढं आपटूनही पिल्लू जिवंत असल्याचे पाहून तो माथेफिरू त्या पिल्लाला पायाने चिरडतो.

तो भयंकर व्हिडीओ पाहून मला अतिशय दुख झाले आहे. या घटनेत कडक कारवाई करण्यात येईल. जो या घटनेला जबाबदार आहे त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केले आहे.