
मध्य प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्याने दलित व्यक्तीच्या तोंडावर लघुशंका केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सोनभद्र जिल्ह्यातील घटिता गावात एका व्यक्तीने आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुलाब असे त्या पीडित व्यक्तीचे नाव असून तो व आरोपी जवाहर पटेल हे 11 जुलैला एकत्र बसून दारू पित होते. त्यावेळी काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जवाहरने गुलाबला मारहाण केली. मारहाणीमुळे गुलाब जमिनीवर पडलेला असताना जवाहरने त्याच्या कानात लघुशंका केली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी गुलाबने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर जवाहर सहीत दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रवेश शुक्ला नावाच्या भाजप कार्यकर्त्याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कडक कारवाईचे आदेश दिले होते.



























































