आई आणि मुलाच्या अतुट प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी सध्या सगळ्यांचे मन जिंकतेय. कोरोनामुळे आई गमावलेल्या एका मुलाने आईच्या आठवणीत चक्क तिची हुबेहूब सिलिकॉनची मूर्ती साकारली आहे. देवाच्या बाजूला त्याने आईची मूर्ती ठेवली असून संपूर्ण कुटुंब रोज तिची पूजा करते. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून असे वातावरण तयार करतात की जणू त्यांची आई जग सोडून गेली नसून घरी त्यांच्यासोबतच आहे. मुले आईसोबत सेल्फी घेतात, सणही साजरे जातात.
मध्य प्रदेशच्या कटनीमध्ये राहणाऱया सावित्री सोनी यांचा 2021 साली कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर सोनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हळुहळू कुटुंब या दुःखातून सावरले. धाकटा मुलगा अभिषेक मात्र आईच्या विरहाच्या दुःखात डिप्रेशनमध्ये गेला. याबाबत अभिषेक म्हणाला, आईवर माझे अतुट प्रेम असल्याने मी नेहमी आईच्या आठवणीत हरवून जातो. आई कुठेतरी दिसेल, कुठूनतरी मला हाक मारेल या विचाराने मी डिप्रेशनमध्ये गेलो. पुढे तो म्हणाला, सोशल मीडियावर मला बंगळुरूमधील एका कलाकाराची माहिती मिळाली, जो व्यक्तीची हुबेहूब प्रतिकृती साकारतो. मी त्याला वारंवार विनंती केली त्यानंतर त्याने मला आईची सिलिकॉनची मूर्ती तयार करून दिली. जेव्हा सिलिकॉनची मूर्ती अचानक घरी पोहोचली तेव्हा ती पाहून कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
























































