गाडीच्या छताला फोडत आलेला दगड डोक्यावर पडला, चालकाचा मृत्यू

एखाद्याची वेळ भरलेली असली की मृत्यू कसाही येतो असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. चालत्या गाडीच्या छताला फोडत आलेला दगड डोक्याला लागल्याने चालकाचा भयंकर पद्धतीने मृत्यू झाला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या बैतुल इथे हा भीषण प्रकार घडला. बँकेत काम करणारे तीन कर्मचारी बैतुल-नागपूर महामार्गावरून आपल्या गाडीने मुलताई इथे चालले होते. तिघांमध्ये गप्पागोष्टी चालल्या होत्या. पण अचानक बंदुकीची गोळी सुटावी इतक्या वेगाने एक दगड गाडीच्या छतावर पडला. तो इतक्या जोरात येऊन पडला की, त्याने गाडीच्या छतालाही फोडलं आणि तो गाडी चालवणाऱ्या अशोक वर्मा यांच्या डोक्यावर पडला. चालत्या गाडीत इतक्या वेगाने दगड येऊन बसल्याने अशोक यांचं डोकं फुटलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना अवघ्या काही क्षणात घडली. पण, ते दृश्य अतिशय भयानक होतं. महामार्गाशेजारी असलेल्या दगड खाणीत केलेल्या स्फोटामुळे दगड उसळून महामार्गावर आला आणि वर्मा यांना लागला. पोलिसांनी खाणीचं काम बंद केलं असून स्फोट करणारा क्रशर सील केला आहे. या भीषण घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महामार्गावर अतिशय वेगाने धावणाऱ्या गाड्यांना स्फोटापूर्वी रोखण्यात का आलं नाही. महामार्गाशेजारीच इतका मोठा स्फोट का करण्यात आला आणि त्यापूर्वी सुरक्षेची खबरदारी का घेण्यात आली नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या