
देशभरात पावसाने धुमशान मांडलं आहे. अनेक राज्यांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत 50 हून अधिक जणांना घेऊन जाणारा ट्रक पडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
दतिया जिल्ह्यातील बुहारा गावात मंगळवार-बुधवार दरम्यान पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. 50 हून अधिक जणांना वाहून नेणारा ट्रक येथील नदीवरचा पूल पार करत होता. त्यावेळी मुसळधार पावसामुळे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत जाऊन पडला. लोकांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी बुडणाऱ्यांची मदत करायला सुरुवात केली. दरमायन, पोलीस, रुग्णवाहिका यांनाही पाचारण करण्यात आलं.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं अपघातग्रस्तांना मदत करत आहेत. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. त्यापैकी तीन मृतदेह लहान मुलांचे आहेत. उर्वरित लोक बेपत्ता आहेत. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा पूल निर्माणाधीन पूल होता. मुसळधार पावसामुळे पुलाच्या रुंदीचा अंदाज न आल्याने हा ट्रक नदीत कोसळला.

























































