
आरक्षण व्यवस्था ही स्वतंत्र हिंदुस्थानला बळकट करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना होती. परंतु आरक्षण सतत वाढवले गेले. त्यामुळे जातीभेद संपले नाहीत. जातीभेद संपवण्याच्या हेतूला बेमुदत लागू झालेल्या आरक्षणाचा धक्का बसला आहे, असे महत्त्वपूर्ण मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
हिंदुस्थानी संविधानाच्या निर्मितीवेळी संविधानसभेने कल्पना केलेल्या आरक्षणाची व्यवस्था वारंवार केलेल्या बदलांमुळे तसेच जातीव्यवस्था पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नांमुळे डोक्यावर बसली आहे, असे न्यायालय म्हणाले. शाळा-महाविद्यालयांचे प्रवेश, नियुक्ती आणि पदोन्नती या गोष्टी गुणवत्तेच्या आधारे ठरवल्या जाऊ शकतील, या दृष्टीने नागरिकांना सशक्त बनवण्याऐवजी आरक्षणाची मुदत वाढवली जात आहे. जातीव्यवस्था नष्ट करायचे सोडून आरक्षणाचा उपाय बेमुदतपणे जपला जात आहे, असे मुख्य न्यायमूर्ती संजिब बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले.



























































