
मागाठाणे विधानसभेत कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे तब्बल आठ एकर जागेवर भव्य हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क आणि सेल्फी पॉईंट साकारला आहे. शिवसेना नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या मंगळवार, 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता या ड्रीम पार्कचे लोकार्पण होणार आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. 25 च्या नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांच्या निधीतून हे ड्रीम पार्क साकारले आहे.
मागाठाणे विधानसभेतील नागरिकांसाठी हे ड्रीम पार्क आणि सेल्फी पॉईंट आकर्षणाचे मोठे केंद्र ठरणार आहे. या ड्रीम पार्कमध्ये ओव्हर ब्रिज, सायकलिंग आणि जॉगिंग ट्रक, ओपन एअर ऍम्फीथिएटर, लहान मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, ट्विन्स टॉवर, सेल्फी पॉईंट, मल्टी कलर पेर्गोला, पाण्याचे कारंजे आहेत. लोकार्पण सोहळ्याला राज्याचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेविका माधुरी भोईर, माजी नगरसेवक योगेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.



























































