
नॉर्वेच्या कार्लसनने पाचव्यांदा बुद्धिबळच्या जगज्जेतेपदाचा बहुमान मिळवला. 31 वर्षीय कार्लसन 2013 पासून या स्पर्धेचा विजेता असून त्याचे हे सलग पाचवे जगज्जेतेपद होय हे विशेष. दुबईत झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रशियाच्या इयान नेपोमनियाचिटचा पराभव केला. कार्लसनचे 7.5 गुण, तर नेपोचे 3.5 इतकेच गुण होते. या स्पर्धेच्या इतिहासातील गेल्या 100 वर्षांतील हा सर्वांत मोठय़ा अंतराचा विजय ठरला आहे. 1921 मध्ये हवाना येथे झालेल्या जोस रॉल केपाब्लेंका आणि इमानुअल नेस्कर यांच्यातील लढतीतही इतके अंतर नव्हते.
हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदला नमवून 2013 मध्ये प्रथमच जगज्जेतेपद काबीज करणाऱया कार्लसनने यंदाच्या स्पर्धेत 14 पैकी 11 व्या डावांतच जेतेपदावर आपले नाव कोरले. विजयासाठी खेळाडूला एक अंक, तर ड्रॉसाठी अर्धा गुण मिळतो. कार्लसनने 11 पैकी 4 डावांत विजय मिळवला, तर नेपोला एकाही डावात विजय मिळवता आला नाही. सात डाव ड्रॉ झाले. अंतिम डावात दोन्ही खेळाडू बरोबरीवर होते, पण नेपोने राजाच्या समोरचा प्यादा पुढे नेण्याचा निर्णय घाईत घेतला. अखेर नेपोला पराभव स्वीकारावा लागला. नेपोचा ज्या पद्धतीने पराभव झाला तो या स्पर्धेच्या 135 वर्षांच्या इतिहासातील सर्वांत मानहानीकारक पराभव मानला जात आहे.
दीर्घकाळ चाललेला डाव
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहावा डाव महत्त्वाचा ठरला. यात 136 चाली खेळल्या गेल्या. 7 तास 45 मिनिटे चाललेल्या या डावात कार्लसनने बाजी मारली. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात दीर्घकाळ चाललेला डाव ठरला. वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला 9.08 कोटी, तर नेपोला 6.05 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.




























































