महाआघाडीचे पक्षानुसार खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे गृह, नगरविकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीचे पक्षानुसार खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास खाते सोपवण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ आणि ग्रामविकास खाते देण्यात आले आहे. तर काँग्रेसकडे महसूल आणि शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर खात्यांची जबाबदारी निश्चित केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकामसह दहा विभाग, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदासह सहा विभाग, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जासह सहा विभाग, सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, परिवहनसह बारा विभाग, जयंत पाटील यांच्याकडे वित्त, गृहनिर्माणसह सात विभाग तर नितीन राऊत यांच्याकडे आदिवासी, महिला व बालविकाससह नऊ विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

असे आहे खातेवाटप
उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
एकनाथ शिंदे – गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
बाळासाहेब थोरात – महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

सुभाष देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

डॉ. नितीन राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम कगळून), आदिवासी विकास, महिला व बालकिकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.