मुख्यमंत्री असताना कुणाकुणाला धमकावलं हे सांगायला भाग पाडू नका! फडणवीसांच्या वक्तव्याचा नेत्यांनी घेतला समाचार

राज्याच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिले नाही, असे वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

फडणवीसांनी ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी कुणाकुणाला धमकावले हे सांगायला भाग पाडू नये, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी साम-दाम-दंड भेदाची भाषा बोलणाऱया फडणवीसांना मुख्यमंत्र्यांची भाषा आक्षेपार्ह कशी वाटू लागली, असा टोला लगावताना विरोधकांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षपूर्तीनिमित्त दै. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत ‘अन्यथा हात धुऊन मागे लागू’ असा इशारा दिला होता. यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत. चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रात फार काळ टिकणार नाहीत, असे वक्तव्य केले त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले.

साम-दाम-दंडाची भाषा करणाऱ्यांना आपल्या भाषेचा विसर पडलाय 

मुख्यमंत्री असताता फडणवीसांना सभ्यतेच्या भाषेचा विसर पडला ती भाषा त्यांना विरोधी पक्षात आल्यावर आठवू लागली आहे. साम-दाम-दंड-भेदाची भाषा करणारे, शेतकरी सुकाणू समितीला जीवाणू समिती, आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे, विरोधकांना कोडगे -निर्लज्ज म्हणणारे ईसीएफ विरोधी पक्षाची दलाल म्हणून संभावना करणारे देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय आहे असे म्हणतात याचे  आश्चर्य वाटते, अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी केली.

फडणवीसांनी धमक्या दिल्याच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप बाहेर काढू!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले त्यामध्ये त्यांनी धमकावणे कधी केले नाही. पण एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नाही, त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनची पद्धत आहे. त्याच आधारावर विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे वक्तव्य केले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या त्याच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप त्या काळात अनेकांनी पाहिले ते पुनः पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशारा मुंडे यांनी फडणवीस यांना दिला. ‘भाजप किती ताकदवान आहे हे येणाऱया पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसेलच,’ असे स्पष्ट आव्हानच त्यांनी भाजपला दिले.

तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म? 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटले, कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम-दाम-दंड-भेदाची भाषा मुख्यमंत्री बोलले नाहीत.

त्यामुळे उद्धव ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरे ला कारे करण्याची रोखठोक मऱ्हाटी त्यांना अशोभनीय वाटली असावी, असा टोला लगावताना शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेत्यांची कीव करावी की त्यांच्या असहायतेवर सहानुभूती व्यक्त करावी, असा सवाल केला.

आपली प्रतिक्रिया द्या